नवी दिल्ली : पाकिस्तान सीमेपलिकडून होणारा दहशतवाद आणि गोळीबार बंद करत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवली जाणार नाही, असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयासंबंधित खासदारांच्या सल्लागार समितीच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली.
''भारतात पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसोबत चर्चा झाली होती. दोन्ही देशांमध्ये कैद असलेल्या 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना, महिलांना आणि मानसिक स्थिती नीट नसलेल्यांना सोडून देण्यात यावं'', असा प्रस्ताव मांडल्याचंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं.
''इतर ठिकाणीही मालिका शक्य नाही''
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका एखाद्या तिसऱ्याच ठिकाणी होण्याचीही शक्यता नसल्याचं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तान त्यांच्याकडील दहशतवाद बंद करत नाही, तोपर्यंत हे शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.