हैदराबाद : शेतीसाठी 24 तास अखंडपणे मोफत वीजपुरवठा करणारं तेलंगणा हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही महत्वाची भेट दिली.

याची चाचपणी गेली अनेक महिने सुरु होती. नोव्हेंबर महिन्यात शेवटचे दोन आठवडे 24 तास अखंड वीजपुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाला. त्यासाठी लागणाऱ्या ट्रान्सफॉर्मर्स आणि सबस्टेशन्ससाठी अंदाजे 13 हजार कोटी खर्च आला.

आधी 9 हजार 500 मेगावॉट वीज लागायची, आता मागणी वाढून 11 हजार मेगावॅटवर पोहचणार आहे. राज्याची वीज निर्मिती क्षमता 2014 साली साडे सहा हजार मेगावाट होती, ती आज 15 हजार मेगावाटवर पोहोचली आहे.

31 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी कृषी पंपांना/ शेतीला 24 तास अखंड आणि मोफत वीजपुरवठा सुरु झाला. अशाप्रकारे शेतीला वीजपुरवठा करणारं तेलंगणा हे देशातलं पहिलं राज्य असल्याचा दावा के. चंद्रशेखर राव यांनी केला.

विरोधकांनी मात्र यामुळे वीजेचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली आहे. काही राज्यांमध्ये शेतासाठी मोफत वीज दिली जाते, मात्र ती काही तासांसाठी असते, तर काही राज्यात 24 तीस वीज दिली जाते, पण ती मोफत नसते. मात्र 24 तास अखंडपणे मोफत वीज देणारं तेलंगणा हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे.

 राज्यात वीज नसल्याने पिकं करपली

राज्यात शेतकऱ्यांच्या थकीत बिलामुळे वीज कनेक्शन कापलं जात आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पीक येईल, अशी आशा होती. मात्र पाणी असूनही कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बोंडअळीमुळे कापसावर अगोदरच परिणाम झाला आहे. त्यातच आता वीज कनेक्शन कट केल्यामुळे हरभरा, ज्वारी या पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.