सिडनी: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पैलवान बबिताकुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली. 53 किलो फ्री स्टाईल कुस्तीत बबिताने हे पदक पटकावलं.
फायनलमध्ये बबिताला कॅनडाच्या डायना विकरने पराभूत केलं. त्यामुळे बबिताचं सुवर्णपदक हुकलं. डायनाने बबिताचा 5-2 असा पराभव केला.
महिलांच्या 53 किलो फ्री स्टाईल कुस्तीत बबिता कुमारीने सलग तीन विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र सलग तीन कुस्त्या खेळल्यामुळे, बबिता काहीशी दमलेली दिसत होती.
त्यामुळे डायना विकरने त्याचा फायदा घेत, पहिल्यापासूनच आक्रमक कामगिरी केली. डायना आधी 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दोघींना 2-2 गुण मिळाल्याने बबिता 2 आणि डायना 3 असे गुण झाले.
मात्र अखेरच्या मिनिटात दोघींमध्ये तुफान झटापट झाली. यामध्ये पुन्हा डायनाने 2 गुणांची कमाई करत निर्णायक आघाडी घेतली.
एकीकडे बबिताची कुस्ती सुरु होती, तर दुसरीकडे देशभरातील कुस्तीप्रेमी मुठी आवळून ती कुस्ती पाहात होते. महत्त्वाचं म्हणजे बबिताची मोठी बहिण गीता फोगट ही कॉमेंट्री करत होती.