न्यू जर्सी : चिलीनं अर्जेन्टिनावर मात करत सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिकाचं विजेतेपद मिळवलं. पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीने 4-2 ने अर्जेन्टिनाचा धुव्वा उडवला. त्यामुळे अर्जेन्टिला पुन्हा एकदा उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं.

 
न्यू जर्सीच्या मेटलाईफ स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना आधी निर्धारित वेळेत आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत गोल करण्यात अपयश आलं. मग पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीच्या आर्थुरो विदाल आणि अर्जेन्टिनाच्या लायनेल मेसीला गोल करण्यात अपयश आलं. त्यानंतर चिलीसाठी निकोलस कॅस्टिलो, चार्ल्स अरांग्वेझ आणि जीन ब्युसाजोरनं गोल केले. तर अर्जेन्टिनासाठी जेव्हियर माशेरानो आणि सर्जियो अॅग्वेरोनं गोल डागले.

 
अर्जेन्टिनाच्या लुकास बिग्लियाची पेनल्टी किक चिलीचा गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होनं थोपवून लावली आणि चिलीला विजयाचं दार उघडून दिलं. मग फ्रान्सिस्को सिल्वानं गोल झळकावून चिलीचा 4-2 असा विजय निश्चित केला.

 
या सामन्यात चिलीच्या मार्सेलो डियाझ आणि अर्जेन्टिनाच्या मार्कोस रोहोला अखिलाडूवृत्तीसाठी रेड कार्ड दाखवण्यात आलं. दरम्यान चिलीनं गेल्या वर्षी झालेल्या कोपा अमेरिकातही अर्जेन्टिनाचा धुव्वा उडवून विजेतेपद मिळवलं होतं. चिलीचा गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होला गोल्डन ग्लोव्हचा पुरस्कार देण्यात आला.

 


लायनेल मेसीचं स्वप्न पुन्हा भंगलं


पाच वेळा जगातल्या सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान मिळवणाऱ्या लायनेल मेसीचं विजेतेपद मिळवण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. मेसीनं व्यावसायिक फुटबॉलमध्ये जवळपास सर्वच विजेतेपदं मिळवण्याचा पराक्रम गाजवलाय. पण अर्जेन्टिनासाठी मात्र त्याला अजूनही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे पेले आणि मॅराडोना यांच्या पंक्तीत मेसीला स्थान द्यायचं की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागलाय.

 
अर्जेन्टिनाला सलग तिसऱ्या वर्षी एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. याआधी 2014 साली झालेल्या फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये जर्मनीनं अर्जेन्टिनाला 1-0 असं हरवलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी कोपा अमेरिकात अर्जेन्टिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. आणि यंदाही कोपा अमेरिकात अर्जेन्टिनाची झोळी रिकामीच राहिली. अर्जेन्टिनाला 1993 च्या कोपा अमेरिकानंतर आजवर एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही.