मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला पोहोचलेल्या टीम इंडियामध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. काही वृत्तानुसार, कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं कळतं.


कोहली आणि कुंबळेमध्ये फूट!
विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर नाराज आहेत. अनिल कुंबळे ज्यापद्धतीने संघाला मार्गदर्शन करतो, त्यावर खेळाडू नाखुश आहेत. कुंबळे संघात वट निर्माण करत आहे. ह्या वागणुकीमुळेच खेळाडूंनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कुंबळेची तक्रार केली आहे. टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये कुंबळेच्या अॅटिट्यूडला कंटाळले आहेत. खेळाडूंच्या मते, कुंबळे ड्रेसिंग रुममधील त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीदरम्यान दोघांमध्ये धुसफूस
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील धुसफूस मार्च महिन्यात धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यादरम्यान सुरु झाली. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या संघातील समावेशाबद्दल विराट कोहलीला अगदी शेवटच्या क्षणी सांगण्यात आलं होतं, असं काही वृत्तात म्हटलं आहे.

'त्रिदेव' करणार कुंबळे आणि कोहलीमध्ये समेट
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 4 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधी कुंबळे आणि कोहलीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सल्लागार समितीचे सदस्य आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दोघांमध्ये समेट घडवून आणू शकतात. मात्र टीम इंडियाचा नवा प्रशक्षिक निवडण्याची जबाबदारीही याच तीन दिग्गजांवर सोपवण्यात आली आहे.

बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेवर नाराज
बीसीसीआयचं विद्यमान अधिकाऱ्यांना अनिल कुंबळे पसंत नाही. बीसीसीआयचे हे अधिकारी चॅपियन्स ट्रॉफी न खेळण्याची धमकी देत होते, तेव्हा कुंबळेनेच सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीला संदेश पाठवून, खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. ही बाब बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आवडली नाही.

याशिवाय कसोटी, वन डे आणि टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या खेळांसाठी वेगळा करार करण्याची कुंबळेची मागणी बीबीसीआयला आवडली नव्हती. बीसीसीआयच्या वार्षिक करारातल्या ‘अ’ श्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150 टक्क्यांनी वाढ करावी अशी मागणी भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीने केली आहे.

संबंधित बातम्या

कुंबळेवर BCCI नाराज, टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु

champions trophy 2017 : आता बॅटमध्ये मायक्रो चिप, ICC चा निर्णय