मुंबई: खांद्याच्या दुखापतीमुळं आयपीएलच्या दहाव्या मोसमातून माघार घ्यावी लागलेला टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुल चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तंदुरुस्त होण्याची शक्यता धूसर आहे.
दस्तुरखुद्द राहुलनंच तो तंदुरुस्तीपासून खूप दूर असल्याची कल्पना दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त होण्याची प्रतीक्षा करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही, असं सांगून तो म्हणाला की, सध्या तरी मी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तंदुरुस्त होण्याची शक्यता खूप कमी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुण्याच्या पहिल्या कसोटीत राहुलच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. ती दुखापत घेऊनच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळला. त्यानंतर राहुलच्या दुखापतग्रस्त खांद्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाली असून, त्याला किमान 2-3 महिने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.
राहुलच्या जागी कोण? 4 पर्याय
4) गौतम गंभीर
राहुलच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात सलामीवीर रोहित शर्माच्या सोबतीला कोण येणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय म्हणजे गौतम गंभीर होय.
गंभीर अनुभवी खेळाडू आहे. शिवाय सध्याच्या आयपीएलमध्ये तो फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. गंभीरने 6 सामन्यात 57.25 च्या सरासरीने 229 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतकंही ठोकली आहेत.
याशिवाय गंभीरने रणजी चषकातही दमदार कामगिरी केली होती.
3) दिनेश कार्तिक
या स्पर्धेत तामिळनाडूचा अनुभवी खेळाडू आणि विकेटकिपर दिनेश कार्तिकचं नावही चर्चेत आहे. कार्तिकने रणजी चषकात तब्बल 704 धावा ठोकल्या आहेत. याशिवाय 'लिस्ट ए' स्पर्धेत त्याने 12 डावात 854 धाव केल्या.
कार्तिक आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळतो. या संघाचा तो हुकमी खेळाडू आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे तो टीम इंडियाचा दरवाचा ठोठावू शकतो.
2) शिखर धवन
चार वर्षापूर्वी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शिखर धवनने धडाकेबाज कामगिरी केली होती. मात्र चार वर्षानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.
फॉर्म गमावलेल्या शिखर धवनला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून वगळलं होतं. मात्र आता धवन आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात परतण्याच्या तयारीत आहे.
1) ऋषभ पंत
दिल्लीचा तरुण तुर्क आणि वादळी क्रिकेटपटू म्हणून नावारुपास आलेला ऋषभ पंत सध्या क्रिकेट वर्तुळात कमालीचा चर्चेत आहे.
19 वर्षीय ऋषभ पंतने रणजी असो वा सुरु असलेल्या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी केली आहे.
पंतने रणजी चषकात अवघ्या 8 सामन्यात तब्बल 972 धावा ठोकल्या आहेत. रणजीत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे.
पंतच्या याच धडाकेबाज कामगिरीमुळे त्याची भारताच्या टी ट्वेण्टी संघातही निवड झाली होती.
आयपीएलमध्ये पंत झहीर खानच्या दिल्ली संघाकडून खेळतो. विकेटकिपर असलेला पंत दिल्लीकडून सातत्याने धावा करणारा खेळाडू आहे.
त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मासोबत ऋषभ पंत पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.