नागपूर : विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकावर नाव कोरल्यानंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात आनंदाचं वातावरण आहे. 84 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाचा संघ रणजी करंडकाच्या फायनल मध्ये पोहोचला आणि चॅम्पियन ठरला. त्यामुळे युवा क्रिकेटर्स आणि क्रिकेटचं प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये नवचैतन्य पसरलंय.

या विजयामुळे फक्त विदर्भ क्रिकेटला नवीन भरारी मिळेल असे नाही, तर भविष्यात विदर्भाच्या मातीतून नवीन खेळाडू तयार होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागपूरच्या ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट अकॅडमीमध्ये रजनीश गुरबानी, सिद्धेश नेरळ, सिद्धेश वाट आणि आर संजय हे रणजी जिंकणाऱ्या टीमचे चार खेळाडू कधी काळी प्रशिक्षण घ्यायचे, तिथे आज आनंदाचं वातावरण आहे. तिथले युवा खेळाडू भविष्यात आम्हीही विदर्भासाठी खेळून रणजी करंडक जिंकू, असा विश्वास व्यक्त करत आहेत.

विदर्भाची बलाढ्य दिल्लीवर 9 विकेट्स राखून मात

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांत गुंडाळला.

दिल्लीकडून मिळालेलं 29 धावांचं सोपं लक्ष्य विदर्भाने एका विकेटच्या बदल्यात पार केलं. विदर्भाकडून दुसऱ्या डावात अक्षय वाखरेने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर आदित्य सरवटेने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. रजनीश गुरबानीने दोन तर आदित्य सरवटे आणि सिद्धेश नेरळने प्रत्येकी एक विकेट घेतली.

रणजी करंडकाच्या 84 वर्षांच्या इतिहासात विदर्भाने रणजी करंडक जिंकण्याची ही वेळ आहे. विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.

संबंधित बातमी : विदर्भाने इतिहास रचला, पहिल्यांदाच रणजी करंडकाचा मान