मुंबई : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या वनडेत जॉस बटलरने शतकी खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. पण बटलरने आपल्या या संयमी खेळीचे श्रेय भारतीय संघाचा मॅचविनर खेळाडू महेंद्रसिंह धोनीला दिले आहे. रोमहर्षक सामन्यात 110 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिल्यानंतर बटलर म्हणाला, “मी जेव्हा मैदानात होतो तेव्हा शांत कसं राहता येईल याचा विचार करत होतो. दबाव कसा कमी करता येईल याचा विचार करताना या परिस्थितीत धोनीने काय केलं असतं, असाही विचार मी केला. त्यामुळेच मी शांत राहून संधी मिळताच फटकेबाजी केली.” महेंद्रसिंह धोनीने बिकट परिस्थितीत भारताला अनेकदा विजय मिळवून दिले आहेत. म्हणूनच जगातील सर्वोत्कृष्ट फिनशर्सच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. दरम्यान, पाचव्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 206 धावांचे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 114 धावांवरच आपल्या 8 विकेट्स गमावल्या. पण जॉस बटलरने आदिल राशिदसोबत 9 व्या विकेटसाठी 81 धावाची भागिदारी करत इग्लंडला विजय मिळवून दिला. बटलरने 122 चेंडूंत 110 धावांची संयमी खेळी केली. या विजयाबरोबरच इग्लंडने वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 5-0  ने पराभव करत इतिहास रचला.