मुंबई : पावसामुळे रस्ता खचल्याची घटना दक्षिण मुंबईत घडली आहे. दक्षिण मुंबई येथील मेट्रो, गोल मस्जिद जवळचा रस्ता खचला. रस्ता खचल्यामुळे जवळची पाईपलाईनही फुटली. त्यामुळे संपूर्ण रस्ता त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


शनिवारपासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरु असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पावसाचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. वडाळ्यात लॉयेट्स इस्टेट इमारतीच्या पार्किंग भागातील भिंत खचल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत सहा वाहनांचे नुकसान झालं.

रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

हिंदमाता, परळ, भायखळा, माटुंगासह अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. सकाळी काही काळ मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलही विस्कळीत झाली होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा झाला.

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसानं दमदार बँटिंग केली. दरम्यान, संध्याकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे अजूनही पावसाची शक्यता कायम आहे.