पोर्ट ऑफ स्पेन: ब्रिटिश युवा क्रिकेटर अॅड्रियन सेंट जॉन यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनमध्ये घडली आहे. अवघ्या 22 वर्षीय या खेळाडूची हत्या करण्यात आली. अॅड्रियन लंडनमधील क्रिस गेलच्या एका अॅकॅडमीसाठी खेळत होता.

 

बीबीसीच्या माहितीनुसार, मंगळवारी अॅड्रियन आपल्या मित्रासाठी एके ठिकाणी थांबलेला असताना त्याच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. दरोडेखोरांनी त्याला लुटून मग त्याची हत्या केली असल्याची माहिती समजते आहे.

 

अॅड्रियनच्या हत्येनंतर वेस्टइंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने याबाबत ट्वीट केलं. "वाईट बातमी ऐकून दु:ख झालं. त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. अॅड्रियन अॅकॅडमीचा कर्णधार होता."

 

ख्रिस गेलच्या अॅकॅडमचे प्रबंधक डोनावन मिलर म्हणाले की, "माझ्यासाठी ही गोष्ट मान्य करणं खूपच कठीण आहे. एवढ्या चांगल्या व्यक्तीची कोणी कशी काय हत्या करु शकतं?" असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.