व्हायरल सत्य : ब्राझीलच्या बसवर चाहत्यांची अंडी आणि दगडफेक?
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2018 09:21 AM (IST)
ब्राझीलचा संघ ज्या बसमधून प्रवास करत होता त्या बसवर चाहत्यांनी दगड आणि अंडी भिरकावल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ब्राझीलियन चाहत्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
ब्राझील : फिफा विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या ब्राझीलला मायदेशात परतल्यावर चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ब्राझीलचा संघ ज्या बसमधून प्रवास करत होता त्या बसवर चाहत्यांनी दगड आणि अंडी भिरकावल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ब्राझीलियन चाहत्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ जुना असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ 26 मार्च 2018 रोजी यू ट्यूबवर अपलोड केला आहे. म्हणजेच फिफा विश्वचषक सुरु होण्याआधीचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. ब्राझीलने आतापर्यंत पाच वेळा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरल आहे. ब्राझील हा यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र खराब खेळामुळे त्यांचे विश्वचषकातील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. बलाढ्य ब्राझीलवर बेल्जियमने 2-1 ने मात केली. यंदाच्या विश्वचषकात नेमारच्या ब्राझीलकडून विजेतेपदाची अपेक्षा होती. मात्र बेल्जियमकडून झालेल्या पराभवानंतर चाहत्यांचा अपेक्षा भंग झाला. स्टार खेळाडू नेमारला सुद्धा या विश्वचषकात आपली जादू दाखवता आली नाही.