बेलो होरिझोन्टे(ब्राझिल) आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानात सुपरस्टार लायनेल मेसीला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला आहे. फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीत ब्राझिलने लायनेल मेसीच्या अर्जेंटिनाचा 3-0 असा धुव्वा उडवला. त्यामुळे फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीतच अर्जेंटिनाचं आव्हान संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

बेलो होरिझोन्टेमध्ये झालेल्या या सामन्यात फिलिपे कोटिन्योने 25व्या मिनिटाला ब्राझिलचं खातं उघडलं. मग नेमारने पूर्वार्धाच्या अखेरच्या मिनिटाला गोल झळकावून ब्राझिलची आघाडी 2-0 अशी वाढवली. उत्तरार्धात पॉलिन्योनं 58व्या मिनिटाला गोल डागून ब्राझिलच्या 3-0 अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या विजयासह ब्राझिलने गुणतालिकेत 24 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली. पण ब्राझिलकडून झालेल्या पराभवामुळे अर्जेंटिनाची सहाव्या स्थानावर घसरण झाली.

दक्षिण अमेरिकेतून गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकांमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना थेट विश्वचषकात खेळण्याची संधी मिळते. पाचव्या स्थानावरील संघाला प्लेऑफमध्ये खेळावं लागतं. त्यामुळे फिफा विश्वचषकात खेळण्यासाठी अर्जेंटिनाला किमान पाचवं स्थान मिळवावं लागेल.