बंगळुरु : ऑस्ट्रेलियाने बंगळुरु कसोटीच्या पहिल्या डावात 87 धावांची आघाडी घेतलेली असतानाही, टीम इंडियाने या कसोटीला कलाटणी दिली आणि 75 धावांनी विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 112 धावांवर बाद झाला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.


टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या डावात पाचव्या विकेटसाठी केलेली 118 धावांची भागीदारी टर्निंग पॉइंट ठरली. शिवाय आर. अश्विनने घेतलेल्या सहा विकेट्सने हा विजय खेचून आणला.

या रोमांचक सामन्यात तब्बल 115 वर्षांच्या विक्रमाचीही पुनरावृत्ती झाली. या सामन्यातील चारही इनिंगमध्ये उभय संघांच्या एका गोलंदाजाने प्रत्येकी सहा विकेट घेण्याचा विक्रम नोंदवला. क्रिकेटच्या इतिहासात 1902 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटीत चारही इनिंगमध्ये 6-6 विकेट घेतल्या होत्या.

त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ओव्हलच्या मैदानावरील सामन्यात चारही इनिंगमध्ये गोलंदाजांनी 6-6 विकेट घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल शंभरहून अधिक वर्षांनंतर या विक्रमची पुनरावृत्ती झाली आहे.

बंगळुरु कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये नॅथन लॉयनने 8 विकेट घेतल्या, तर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये रवींद्र जाडेजाने 6 गडी बाद केले. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जोश हेझलवुडने 6 गडी बाद केले आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने 6 फलंदाजांना माघारी धाडलं.

संबंधित बातमी : टीम इंडियाचा कांगारुंवर दणदणीत विजय, मालिकेत 1-1नं बरोबरी