नवी दिल्ली : ब्लाईंड वर्ल्डकप 2018 मध्ये टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली. नेपळच्या टीमचा पराभव करुन सलग तीन विजयांची नोंद केली आणि ब्लाईंड वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्येही प्रवेश मिळवला आहे.
ब्लाईंड वर्ल्डकप 2018 च्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. ईडन गार्डनवरील सी. जी. अजमान स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने नेपाळचा 8 विकेट्सने पराभव करत सेमीफायनलचं तिकीट पक्क केलं.
नेपाळच्या टीमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय चुकल्याचे टीम इंडियाने उत्तमपणे गोलंदाजी करत सिद्ध केले. 9 विकेट्सच्या बदल्यात नेपाळने 156 धावांची खेळी केली.
टीम इंडियाच्या प्रकाश जयरमैया (2 विकेट्स) याच्यासह कर्णधार अजय रेड्डी (1 विकेटय), प्रेम कुमार (1 विकेट), रामबीर (1 विकेट) आणि जाफर इकबाल (1 विकेट) यांनी उत्तम गोलंदाजी केली आणि नेपाळवरील दबाव वाढवला.
टीम इंडियाने 2 विकेट्सच्या बदल्यात 156 धावांचं आव्हान पार केलं. अजय गारियाने 54 धावा केल्या, तर महेंदरने नाबाद 40 धावांची खेळी केली. त्याचबरोबर, रामबीरने 38 धावा केल्या.
दरम्यान, टीम इंडियाचा पुढील सामना सेमीफायनलमध्ये बांगलादेशविरोधात होणार आहे. 17 जानेवारी रोजी हा सामना खेळवला जाणार आहे.