मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने 1 मार्च रोजी आपला 38 वा वाढदिवस साजरा केला. व्यावसायिक आयुष्यात अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बूम बूम आफ्रिदीचं वैयक्तिक आयुष्य फारसं प्रकाशझोतात आलं नाही.


मामाच्या पोरीशी लग्न

शाहिद आफ्रिदीने आपल्या मामाच्या मुलीसोबतच लगीनगाठ बांधली होती. शाहिद एकदा घराबाहेर चालला होता. माझ्यासाठी एक मुलगी शोधा, असं तो जाता-जाता वडिलांना मजेतच म्हणाला. शाहिदचं बोलणं वडिलांनी मात्र मनावर घेतलं.

शाहिद घरी परतला, तेव्हा 'तुझ्यासाठी मुलगी शोधली आहे' असं बाबांनी त्याला सांगितलं. ती मुलगी दुसरी-तिसरी कोण नाही तर त्याच्या मामाची मुलगी होती - नादिया. नादियाला तो लहानपणापासूनच ओळखत होता.

शाहिद आणि नादिया यांना अक्सा, अंशा, अज्वा आणि अस्मारा अशा चार मुली आहेत.

शिक्षिकेच्या प्रेमात

जेव्हा मी शाळेत शिकत होतो, तेव्हाच मी पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो. माझं पहिलं प्रेम म्हणजे माझी शिक्षिका होती, असं आफ्रिदीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

'तो बालिशपणा होता. मी नऊ किंवा दहा वर्षांचा असेल. मी शिक्षिकेच्या प्रेमात पडलो होतो. ती खूपच सुंदर होती' असं आफ्रिदी म्हणतो.

तीन वेळा निवृत्ती

फेब्रुवारी 2017 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र यापूर्वी म्हणजे 2006 आणि 2011 मध्येही त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. या मुद्द्यावरुनच त्याला अनेकवेळा ट्रोलही केलं जात असे.

2006 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र काही दिवसातच ती मागे घेतली. मे 2011 मध्ये त्याने पुन्हा निवृत्ती जाहीर केली. मात्र ऑक्टोबर महिन्यात माघार घेतली. लिमिटेड ओव्हरच्या टीम निवडीसाठी आपण उपलब्ध असू, असं त्याने सांगितलं.

2015 मध्ये विश्वचषक संपल्यावर आफ्रिदी वनडे क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याची चर्चा होती, मात्र तोही निर्णय त्याने बदलला. फेब्रुवारी 2017 मध्ये शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. मात्र पुढची दोन वर्ष डोमेस्टिक क्रिकेट खेळणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं.