नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात एकही सामना न खेळता, खासदार पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजनची दिल्लीच्या ट्वेण्टी 20 क्रिकेट संघात निवड झाली आहे. सार्थक रंजनची संघात निवड आणि अंडर-23 क्रिकेटचा टॉप स्कोअरर हितेन दलाल संघाबाहेर झाल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत.
राजेश रंजन उर्फ पप्पू यादव बिहारच्या मधेपुरा तर त्यांची पत्नी रंजीत बिहारच्या सुपौल मतदारसंघातील खासदार आहेत.
चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करुन प्रभावशाली नेत्याच्या मुलाची निवड केल्याने निवड समितीवर जोरदार टीका होत आहे. अतुल वासन, हरी गिडवानी आणि रॉबिन सिंह ज्युनिअर यांचा निवड समितीत समावेश आहे.
याआधी कामगिरी संघात निवड
याआधी मुश्ताक अली स्पर्धेतही सार्थक रंजनची निवड झाल्याने मोठा वाद झाला होता. या स्पर्धेत सार्थकने तीन सामन्यात केवळ 5, 3 आणि 2 धावाच केल्या होत्या. या मोसमाच्या सुरुवातीलाही सार्थकचा रणजी चषकाच्या संभाव्य संघांच्या यादीत समावेश केला होता. पण नंतर त्याने स्वत:च आपलं नाव मागे घेतलं होतं.
सार्थकने क्रिकेटला रामराम ठोकला असून तो आता मिस्टर इंडिया कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा होती. पण आता अचानक मोसम संपताना, सार्थकची आई रंजीत रंजन यांनी डीडीसीएच्या प्रशासकीय न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांना ई-मेल पाठवला. माझा मुलगा डिप्रेशनमध्ये होता पण आता तो खेळण्यासाठी पूर्णत: फिट आहे. न्यायमूर्ती सेन यांनी हे पत्र निवडकर्त्यांना पाठवलं.
"सार्थकची मानसिक परिस्थिती योग्य नव्हती. तो फिट झाल्यावर मी त्याला स्वत: पाहिलं आणि संभाव्य संघात समावेश केला," असं निवड समितीचे सदस्य अतुल वान सांनी सांगितलं.
टॉप स्कोअरर संघाबाहेर
मात्र त्या स्पर्धेत टॉप स्कोअरर असलेला हितेन दलालची संभाव्य संघात निवड न झाल्याने वाद वाढला आहे. दलालने सीके नायडू चषकात एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 468 धावा केल्या होत्या.
सार्थकच्या निवडीवर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर न्यायमूर्ती सेन म्हणाले की, "निवड समितीने कोणाच्याही दबावाशिवाय संघाची निवड केल्याचा आम्हाला विश्वास आहे. सार्थकवर त्याच्या वडिलामुंळे लक्ष जात आहे."
तर आई-वडील प्रभावी राजकारणी नसलेल्या हितेनसारख्या खेळाडूला असं सोडणं योग्य नाही, असं डीडीसीएच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
माझ्या मुलाविरोधात कट
न खेळता माझ्या मुलाची निवड झाल्याचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा सार्थकची आई आणि खासदार रंजीत रंजन यांनी केला आहे. "माझा मुलगा अंडर 14 दिल्ली संघाकडून खेळत आहे आणि त्याच्या नेतृत्त्वात संघ चॅम्पियनही बनला आहे. मागील वर्षी अंडर 23 च्या सामन्यात 65, 40 आणि 193 धावा केल्या आहे. माझ्या मुलाविरोधात कट रचला जात आहे. मी त्याच्या प्रत्येक सामन्याची स्कोअरशीट देऊ शकते," असं रंजीत रंजन म्हणाल्या.