नवी दिल्ली : आपल्या स्विंगच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार लवकरच 'क्लीन बोल्ड' होणार आहे. श्रीलंक कसोटी मालिकेदरम्यान म्हणजेच 23 नोव्हेंबरला भुवनेश्वर त्याची प्रेयसी नुपूरसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. यासाठी भुवी आणि नुपूरच्या घरी जोरदार तयारीही सुरु झाली आहे.


भुवनेश्वर आणि नुपूरचं लग्न मेरठला होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने दोघांचा फोटो शेअर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी भुवनेश्वरची निवड झाली आहे. पण लग्नालामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी (24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर) मुकावं लागू शकतं. कारण की, 23 नोव्हेंबरलाच त्याचा लग्नसोहळा होणार आहे.

दुसऱ्या कसोटीमुळे भुवीच्या लग्नात विराट आणि टीम देखील उपस्थित राहू शकणार नाही. कारण 24 नोव्हेंबरपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध नागपूरमध्ये दुसरी कसोटी खेळणार आहे.



असा असेल भुवीच्या लग्नाचा कार्यक्रम

भुवी आणि नुपूर 23 नोव्हेंबरला लग्नाच्या गाठीत अडकतील. त्यानंतर 26 नोव्हेंबरला बुलंदशहर आणि 30 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. जिथे टीम इंडिया आणि त्याचे खास मित्र हजेरी लावू शकतात.

भुवनेश्वर आणि नुपूर हे दोघंही जवळपासच राहतात. नुपूर मेरठमधील गंगानगर परिसरात राहते. तर भुवनेश्वर देखील त्याच परिसरात राहतो.

कोण आहे नुपूर :

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारची होणारी पत्नी नुपूर नोएडामधून बीटेक झाली आहे. नोएडामध्येच ती एका खासगी कंपनीत काम करते. नुपूर आणि भुवनेश्वरचा साखरपुडा 4 ऑक्टोबरला झाला होता.

संबंधित बातम्या :

त्या सिक्रेट डिनरबाबत भुवनेश्वर कुमार म्हणतो...