मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी अभिनेता शाहरुख खानला त्याच्या चाहत्यांसमोर सुनावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता जयंत पाटलांनी याबाबतची प्रतिक्रियाही एबीपी माझाकडे दिली आहे.


‘मी जेव्हा अलिबागला बोटीनं जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ निघालो त्यावेळी तिथं प्रचंड गर्दी होती. तिथं पोलीस फौजफाटाही होता. ते तिथल्या लोकांना मागे लोटत होते. नंतर मला समजलं की, शाहरुख खान तिथल्या बोटीत बसला आहे. त्यावेळी तिथल्या पोलिसांनी मलाही मागे लोटलं. पण तेथील एका पोलिसानं मला ओळखलं आणि पुढे येण्यास सांगितलं. मी पुढे आलो तेव्हा मला शाहरुख बोटीत सिगरेट पिताना दिसला. तिथूनच तो चाहत्यांना हातही करत होता. तो तिथे जवळजवळ अर्धा तास होता. एकीकडे लोकांना बोटीनं जाण्यास उशीर होत असताना दुसरीकडे पोलीस शाहरुखला संरक्षण देण्यात व्यस्त होते. त्यामुळेच मी त्याला तिथं सुनावलं. मी स्वत: शाहरुखचा चाहता आहे. पोलीस संरक्षण देण्याबाबत माझा आक्षेप नाही. पण त्यावेळी त्याचं वर्तन चुकीचं होतं. लोकांचा खोळंबा होत होता.’ असं ते यावेळी म्हणाले.

‘गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबागला जाण्यासाठी बरीच गर्दी असते. त्यात असा खोळंबा झाल्यास लोकांना आणखी त्रास होतो. पोलिसांकडून शाहरुखला व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट मिळते. तर सामान्य लोकांकडे मात्र दुर्लक्ष होतं. यासोबतच अलिबागमध्ये चालणाऱ्या पार्ट्यांवर देखील आमचा आक्षेप आहे. यासंदर्भात मी वारंवार विधीमंडळातही आवाज उठवला आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया आणि तेथील प्रवाशांच्या दृष्टीनं सरकारनं काही धोरणं ठरवणं गरजेचं आहे. जेणेकरुन असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.’ असं मतंही त्यांनी यावेळी मांडलं.

नेमकं प्रकरण काय :

३ नोव्हेंबरला शाहरुख आपल्या अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परतत होता. अलिबागहून जेव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे इथं आला, त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी गेट वेवरच मोठी गर्दी केली होती.  याचवेळी आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं  निघाली होती. मात्र, शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला आणि त्याच्या चाहत्यांसमोरच त्यांनी शाहरुखला सुनावलं.

 असशील तू कोणीही मोठा स्टार

असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केलं का?, माझ्या परवानगीशिवाय तू येऊ शकत नाही अलिबागला.’ अशा शब्दात त्यांनी शाहरुखला सुनावलं.

तरीही शाहरुख शांतच राहिला!

दरम्यान, जयंत पाटलांचा राग अनावर झाल्यानं शाहरुखने बोटीत बसून राहणंच पसंत केलं. यावेळी त्यानं कोणतंही उत्तर त्यांना दिलं नाही. पाटील आपल्या बोटीकडे निघून गेल्यानंतरच शाहरुख आपल्या बोटीतून बाहेर आला. शाहरुख बाहेर येताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, हा संपूर्ण प्रकार तेथील एका चाहत्यानं रेकॉर्ड केला. सध्या हा व्हिडीओ  सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून याप्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

VIDEO :



संबंधित बातम्या : 

आमदार जयंत पाटील शाहरुखच्या चाहत्यांसमोरच भडकले!