मुंबई : पुढच्या महिन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये होणाऱ्या आशिया चषकापूर्वी भारतासाठी खुशखबर आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तो भारतात सुरु असलेल्या चार संघांच्या टूर्नामेंटमध्ये तो खेळताना दिसणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या स्थानासाठी (29 ऑगस्ट) होणाऱ्या सामन्यातून भुवी पुनरागमन करणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना तिसऱ्या वन डे सामन्यात भुवीला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकावं लागलं.

लंडनमधील सामन्यानंतर भुवीला राष्ट्रीय क्रीडा अकादमीमध्ये पाठवण्यात आलं. तो चार आठवड्यात फिट होईल, असं सांगण्यात आलं. मात्र तो वेळेपूर्वी ठिक न झाल्याने त्याची इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली नाही.

या दुखापतीमुळे भुवीला निधास ट्रॉफी आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यालाही मुकावं लागलं. भारताला दुखापतीचं ग्रहण आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपासूनच लागलं, जेव्हा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतग्रस्त झाला होता.

भुवी आणि बुमराच्या दुखापतीचा भारतीय संघाला मोठा फटका बसला. सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. बुमराच्या पुनरागमनानंतर भारतीय संघाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला.