मुंबई: क्रिकेटवीरांच्या खेळाची जेवढी चर्चा होते, तेवढंच त्यांच्या हेअरस्टाईल आणि फॅशन सेन्सकडेही सगळ्यांचं लक्ष असतं. सध्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे ती विराट कोहलीच्या दाढीची. पण फक्त विराटच नाही, तर सध्याचे अनेक क्रिकेटर्स या 'रफ अँड टफ' लूकला पसंती देताना दिसतात.
विराट कोहली
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या खोऱ्यानं धावा ओढतो आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेतही कोहलीनं पाच कसोटी सामन्यांतच 655 धावांचा रतीब घातला. विराटच्या या शानदार फॉर्मइतकीच त्याच्या दाढीची स्टाईलही लोकप्रिय होत आहे.
एका जमान्यात, अंडर-नाईन्टीन टीमच्या दिवसांत विराट क्लीन शेव्ह लूकला पसंती द्यायचा. पण भारतीय संघात पाऊल टाकल्यापासून विराटनं दाढी राखायला सुरूवात केली. विराटच्या आक्रमक स्वभावाला त्याची दाढीही साजेशी ठरली आहे आणि ब्रँड विराटची ती ओळख बनली आहे.
तसं विराटच्या खेळाची तुलना अनेकजण वेस्ट इंडीजचे महान फलंदाज विव्ह रिचर्डस यांच्याशी करतात. पण विराट आणि रिचर्डसमध्ये आणखी एक साम्य आहे तो त्यांचा हाच दाढीवाला डॅशिंग लूक.
अर्थात आजच्या जमान्यात दाढी राखणारा विराट काही एकटाच क्रिकेटर नाही.
रवींद्र जाडेजा
इंग्लंडविरुद्धची कसोटी गाजवणारा भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाही फॉर्म आणि स्टाईलच्या बाबतीत विराटला टक्कर देतोय. जाडेजा पिळदार मिशांसोबत अलीकडे दाढी वाढवू लागलाय. दाढी म्हणजे माझ्यासाठी आणि टीम इंडियासाठी लकी चार्म ठरल्याचं जाडेजानं गंमतीनं म्हटलंही होतं.
धोनी
कोहली आणि जाडेजाप्रमाणेच भारताच्या वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही दाढी शोभून दिसते. धोनीचा अनुभव आणि टीममधलं स्थान त्याच्या दाढीमुळं अधिक उठून दिसतं.
के एल राहुल
टीम इंडियाचा डॅशिंग सलामीवीर के एल राहुलनेही राकट लूक दाढीने सजवला आहे. मैदानात उतरल्यानंतर चेहऱ्याला सन्सक्रिम लोशन लावलेल्या राहुलची दाढी आणखी उठून दिसते.
मुरली विजय
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर मुरली विजयनेही दाढी ठेवली आहे.
अजिंक्य रहाणे
डॅशिंग मुंबईकर क्रिकेटर अजिंक्य रहाणेलाही त्याच्या चेहऱ्यावर दाढी शोभून दिसते.
बेन स्टोक्स
दाढी राखण्याच्या बाबतीत इंग्लंडचे खेळाडूही मागे नाहीत. एरवी क्लीन शेव्हला पसंती देणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटींमध्ये वेगळ्या अवतारात उतरला. स्टोक्सची लालसर केसांची दाढी सिंहाच्या आयाळीची आठवण करून देते. आणि स्टोक्स एखाद्या मध्ययुगीन योद्धासारखा भासतो.
मोईन अली
स्टोक्सचा टीममेट आणि इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला अजून भारत दौऱ्यावर आपली छाप पाडता आलेली नाही. मात्र त्याचा आत्मविश्वास कायम आहे. बर्मिंगहममध्ये जन्मलेल्या मोईन अलीनं धार्मिक कारणांमुळं दाढी राखली आहे. मोईन अलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर तर बेन स्टोक्सनं दाढीवाल्याची सगळ्यांनाच भीती वाटते, अशी टिप्पणी केली होती.
हाशीम अमला
दाढीवाल्या क्रिकेटवीरांचा विषय निघालाय, तर दक्षिण आफ्रिकेच्या हशीम अमलाला विसरून कसं चालेल? खरं तर अमलानं धार्मिक कारणांसाठी दाढी राखली. पण त्याच्या खेळानं आणि लांब दाढीनंच आजच्या पिढीला क्लीन शेव्ह्ड लूक विसरायला भाग पाडलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मिसबाह उल हक
पाकिस्तानचा दिग्गज कर्णधार मिसबाह उल हक वयाच्या 42व्या वर्षीही आपल्या टीमची धुरा समर्थपणे पेलताना दिसतोय. मिसबाहनं अलीकडेच दाढी राखण्यास सुरूवात केली आहे.
मार्टिन गप्टील आणि विल्यमसन
न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कसोटी कर्णधार केन विल्यमसन यांनीही सध्याच्या ट्रेण्डला साजेशी दाढी राखली आहे. गप्टिल आणि विल्यमसनचा हिपस्टर लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.
अँटॉन डेव्हसिच
किवी टीमचा डावखुरा फिरकी गोलंदाज अँटॉन डेव्हसिचची दाढी तर थेट इंग्लंडचे महान क्रिकेटवीर डब्ल्यू जी ग्रेस यांचीच आठवण करून देणारी आहे.
या सर्व क्रिकेटवीरांचं राकट आणि कणखर व्यक्तीमत्व दाढीमुळं आणखी उठून दिसतंय.