आयसीसीकडून बीसीसीआयला 26 अब्ज रुपये
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2017 01:20 PM (IST)
मुंबई: आयसीसीच्या ज्या महसुलावरुन बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, तो महसूल अखेर मिळाला आहे. आयसीसीच्या महसूल आराखड्यानुसार भारताला 40.5 कोटी डॉलर म्हणजेच 26.15 अब्ज रुपये मिळाले आहेत. सुरुवातीला आयसीसी भारताला 29.3 कोटी म्हणजेच 18.92 अब्ज रुपये देण्यास तयार होतं. मात्र वादविवादानंतर आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी बीसीसीआयला 10 कोटी डॉलर वाढवून देण्यास तयारी दर्शवली होती. त्यानुसार भारताला 11.2 कोटी डॉलर म्हणजेच 7.23 अब्ज रुपये अधिक देण्याचं ठरलं होतं. सर्वात जास्त महसूल मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडला 13.90 कोटी डॉलर म्हणजे 8.98 अब्ज रुपये मिळणार आहेत. 'रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल' हा बीसीसीआयसाठी वादाचा विषय होता. कारण जगातील सर्वात तगड्या अशा बीसीसीआयने 57 कोटी डॉलर अर्थात 36.81 अब्ज रुपयांची मागणी केली होती. मात्र ती आयसीसीने नामंजूर केली होती.