नवी दिल्लीः भारतीय संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय संघ 6 जुलैला वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होईल. टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरुवात ही दोन दिवसीय सराव सामन्यानं होणार आहे. सेंट किट्समध्ये 9 आणि 10 जुलैला हा सामना खेळवला जाईल. मग 14 ते 16 जुलै दरम्यान भारतीय संघ सेंट किट्समध्येच तीन दिवसीय सामना खेळणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज संघांमधली पहिली कसोटी 21 ते 25 जुलै या कालावधीत अँटिगात खेळवली जाईल. उभय संघांमधली दुसरी कसोटी जमैकात 30 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात खेळवण्यात येईल. तिसरी कसोटी 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान सेंट ल्युसियात, तर चौथी आणि अखेरची कसोटी 18 ते 22 ऑगस्ट या कालावधीत त्रिनिदादमध्ये खेळवली जाईल.