IPL 2021: , आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये आयपीएलचं आयोजन पुन्हा केलं जाईल, असं सांगितलं जात आहे. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. आता क्रिकेट आणि आयपीएल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल 14 च्या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आलं आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांचं आयोजन देशातच करण्याचा विचार करत आहेत.
सप्टेंबर महिन्यात होऊ शकतं सामन्यांचं आयोजन
माहितीनुसार, 2021 टी20 वर्ल्ड कपच्या आधी सप्टेंबरमध्ये आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं. टी20 विश्वचषकासाठी सर्व संघ भारतात येणार आहेत. अशात बीसीसीआय आयपीएलच्या खेळाडूंना वेळेआधी बोलावून बाकी राहिलेल्या सामन्यांचं आयोजन करु शकते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं ANI शी बातचीत करताना सांगितलं की, जर देशात सप्टेंबर महिन्यात देशातील कोरोनाची स्थिती कंट्रोलमध्ये आली तर आयपीएलच्या बाकी सामन्यांचं आयोजन भारतात होऊ शकतं. जर विदेशी खेळाडू उपलब्ध होत असतील आणि कोरोनाची स्थिती कंट्रोलमध्ये आली तर निश्चितपणे टी 20 विश्वचषकाआधी आयपीएलचे सामने खेळवू शकतो, असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
इंग्लंडमध्ये होऊ शकतं आयोजन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन इंग्लंडमध्ये केलं जाऊ शकतं. आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन करण्यासाठी इंग्लिश काउंटीच्या वतीनं बीसीसीआयला प्रस्ताव देण्यात आला आहे.
आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर IPL रद्द
दरम्यान, आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये आतापर्यंत 29 सामने पार पडले होते. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आयपीएलचं आयोजन होणार का? झालं तर कुठे होणार आणि कधी होणार? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात आहेत. 4 मेरोजी मंगळवारी आयपीएल गवर्निंग काउंसिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीसीसीआयनं आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बायो बबलमध्ये असूनही कोरोनाची लागण झाल्यानं बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.