इंदूर : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुली सेकंड इनिंगमध्ये बंगाल क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवत आहे. मात्र सोबत जाहिरातींमध्ये सुरु असलेली 'दादा'ची चमकोगिरी बीसीसीआयच्या डोळ्यात खुपत आहे. गांगुली दोन दगडांवर पाय का ठेवत आहे, असा सवाल 'बीसीसीआय'ने विचारला आहे.


ब्रँड्सच्या विश्वात गांगुलीचं नाव अजूनही आघाडीवर आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान एमपीसीए मैदानावर गांगुलीचं भलंमोठं पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. किंग्ज इलेव्हन पंजाबचे अधिकृत लॉजिस्टिक पार्टनर असलेल्या कुरिअर कंपनीचा गांगुली ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना त्याने जाहिराती कराव्यात का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचा सदस्य असताना आयपीएलमधील एखाद्या संघाच्या सहप्रायोजकांचं प्रमोशन गांगुलीने करणं कितपत योग्य आहे, असा सवालही विचारला जात आहे.

आयसीसीच्या आगामी बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व कुणी करायचं यासाठी गांगुली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यात स्पर्धा आहे. आयसीसीची ही बैठक 24 एप्रिलला दुबईत होत आहे. गांगुली सध्या एका टीव्ही शोमध्ये एक्स्पर्ट म्हणून, तर एका वृत्तपत्रात स्तंभलेखन करतानाही दिसत आहे.