अहमदाबादः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. BCCI च्या या 89 व्या आमसभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आजच्या या सभेत दोन नवीन संघांना आयपीएलमध्ये सहभागी करणं, भारतात जागतिक स्पर्धांवरील टॅक्सबाबत आयसीसीची मागणी आणि विविध क्रिकेट समित्यांच्या नियुक्त्या असे महत्वाचे मुद्दे अजेंड्यावर आहेत.

Continues below advertisement

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या निवडीची औपचारिक घोषणा देखील आज होणार आहे. जे आधीच सर्वसंमतीने निवडले गेले आहेत. दरम्यान बृजेश पटेल हे आयपीएल संचालन परिषदेचे प्रमुख असतील. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या जाहिराती आणि त्याच्याशी संबंधित मुद्यांवर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन संघांना मंजूरी आयपीएल 2022 साठी नवीन दोन संघांना देखील मंजूरी मिळण्याची आज शक्यता आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आयपीएलमध्ये दहा संघ ठेवणे 2021 मध्ये शक्य नाही. यासाठी निविदा प्रक्रिया आणि लिलावाची प्रक्रियेसाठी वेळ लागणार आहे. इतक्या कमी वेळात त्यामुळं 2021 च्या आयपीएलमध्ये 10 संघ असणं शक्य होणार नाही. आता या संघांना मंजूरी मिळाली तर 2022 मध्ये 94 सामन्यांची मालिका होईल, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

Continues below advertisement

दुसरीकडे आयसीसीला ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी टॅक्समध्ये सूट देण्याच्या आश्वासनाचा कालावधी एका आठवड्याचा राहिला आहे. जर असं झालं नाही तर टूर्नामेंट यूएईमध्ये खेळवलं जाईल. आयसीसीच्या मंचावर बीसीसीआय सचिव आणि अध्यक्ष सौरव गांगुली बोर्डाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त असतील.

नवी क्रिकेट सल्लागार समिती बीसीसीआयने जर 2028 लॉस एंजिलिस ऑलंपिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाला पाठिंबा दिला तर त्यांची स्वायत्तता संपेल आणि राष्ट्रीय खेळ महासंघ असल्यामुळं ते क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत जाईल, या मुद्द्यावर देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या विविध समित्यांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया बऱ्याच काळापासून थांबलेली आहे. आजच्या बैठकीत यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.