सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर बांगलादेशने जोरदार सेलिब्रेशन केलं. बांगलादेशचा फलंदाज तस्कीन अहमदने सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये खेळाडू बांगलादेशी व्हर्जनमधील ‘हम होंगे कामयाब…’ या गाण्यावर सेलिब्रेशन करत आहेत.
बांगलादेश फायनलचे स्वप्न पाहत असला तरी भारताशी मुकाबला करणं त्यांच्यासाठी एवढं सोपं नसेल. कारण गेल्या काही दिवसातल्या भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारताचं पारडं स्वाभाविकपणे जड दिसून येतं.
टीम इंडियाने ब गटातून दोन विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर बांगलादेशने एक विजय मिळवला आणि दुसरा संघ बाहेर गेल्याने सेमीफायनलचं स्वप्न पूर्ण झालं. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, ज्याचा फायदा बांगलादेशला झाला.
टीम इंडियाने बांगलादेशला गेल्या वर्षी दोन टी-20 सामन्यांमध्ये पराभवाची धूळ चारली आहे. तर वन डेमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने 82 टक्के सामने जिंकले आहेत.
सराव सामन्यात बांगलादेशचा लाजीरवाणा पराभव
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली होती. भारताने तब्बल 240 धावांनी विजय साजरा केला होता. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ शंभर धावांच्या आत म्हणजे केवळ 84 धावांवरच गुंडाळला होता.
गतविजेत्या भारताची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात धडक मारण्याची ही पाचवी वेळ आहे. याआधी भारताने 1998, 2000, 2002, 2013 आणि आता 2017 मध्येही उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.