Bajrang Punia : भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्यूएफआय) मान्यता रद्द केल्यानंतर आज (24 डिसेंबर) कुस्तीपटू बजरंग पुनियाने यांन्याय मिळत नाही तोपर्यंत पद्मश्री पुरस्कार परत घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बजरंग पुनिया म्हणाला की, मी पद्मश्री परत घेणार नाही. मला न्याय मिळाल्यावरच मी याचा विचार करेन.'' तो पुढे म्हणाला की, ''आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणतेही बक्षीस मोठे नाही. आधी न्याय मिळाला पाहिजे."
बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या निवडीच्या निषेधार्थ पद्मश्री परत केला होता. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगने शुक्रवारी (22 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी आणि निषेध पत्र सादर करण्यासाठी कर्तव्यपथवर आला होता. मात्र, पोलिसांनी रोखले. यानंतर बजरंगने आपले पद्मश्री पुरस्कार फुटपाथवर ठेवला होता.
टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाने मोदींना पत्र लिहिले होते. या पत्रात त्याने बृजभूषण यांच्या विरोधातील आंदोलनापासून ते त्यांच्या जवळच्या मित्राच्या निवडणुकीतील विजयापर्यंत आणि सहकारी मंत्र्याशी झालेल्या संभाषण आणि त्यांच्या आश्वासनापर्यंत सर्व काही सांगितले होते आणि शेवटी पद्मश्री परत करणार असल्याचे सांगितले होते.
साक्षी मलिक काय म्हणाली?
दुसरीकडे, या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना साक्षी मलिक म्हणाली, "मला अद्याप लेखी काहीही दिसलेलं नाही. केवळ संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे की संपूर्ण संस्थेला निलंबित करण्यात आले आहे, हे मला माहीत नाही. आमचा लढा विरोधी सरकार विरोधात नव्हता. आमचा लढा महिला कुस्तीपटूंसाठी आहे. मी माझी निवृत्ती जाहीर केली आहे, पण आगामी कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे."
भाजप खासदार बृजभूषण सिंह सपशेल नरमले
क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) मोठी कारवाई केली आहे. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर लगेचच ब्रिजभूषण शरण सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह आपल्या अशोका रोडवरील निवासस्थानातून बाहेर पडले आणि जेपी नड्डा यांच्या घरी गेले. बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्ती संघटनेतून निवृत्तीची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, “मी 12 वर्षे कुस्तीपटूंसाठी काम केले आहे. मी न्याय दिला की नाही हे काळच सांगेल. आता सरकारसोबतचे निर्णय आणि वाटाघाटी महासंघाचे निवडून आलेले लोक घेतील. मी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकाही येत आहेत, त्यामुळे माझे लक्ष त्याकडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुस्ती संघटना क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या