नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांनी प्रो रेसलिंग लीगच्या आखाड्यात चक्क शड्डू ठोकून आपल्या कुस्तीकौशल्याचं प्रदर्शन केलं. मुंबई आणि पंजाब संघांमधल्या उपांत्य लढतीच्या निमित्ताने बाबा रामदेव यांच्या प्रदर्शनीय कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं.


या कुस्तीत बाबांसमोर आव्हान 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता पैलवान आंद्रे स्टॅडनिकचं होतं. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये स्टॅडनिकनेच भारताच्या सुशीलकुमारला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती.



प्रो रेसलिंग लीगच्या प्रदर्शनीय लढतीत आंद्रे स्टॅडनिकने बाबा रामदेव यांचं वय आणि त्यांची प्रतिष्ठा लक्षात घेऊन, त्यांच्याशी लुटूपुटूची कुस्ती केली. बाबा रामदेवांनी आपल्याला ज्ञात असलेले सारे डाव टाकून गुण वसूल केले. त्यामुळे या कुस्तीत अखेर सरशी बाबा रामदेव यांचीच झाली.