सातारा : आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशावरील चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. साताऱ्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी यावर उत्तर दिलं. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलणं त्यांनी टाळलं.


जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी उदयनराजे वेगळी चूल मांडण्याच्या चर्चा होत्या. आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसलेंसोबतच्या मतभेदांमुळे शेंद्रे येथे शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात उदयनराजेंविरोधात जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी भाषणातून आगपाकड केली होती.

शरद पवारांनी याबाबत कोणतीही भूमिका न मांडता नोटाबंदीवरच्या निर्णयावरच संपूर्ण भाषण उरकलं. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल, असं सूचक वक्तव्यही शरद पवारांनी केलं होतं.

त्यामुळे उदयनराजे हे भाजपमध्ये जाणार, या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं. याबाबत भाजपच्या अनेक नेत्यांनीही त्यांचं स्वागत असल्याचं म्हटलं होतं.

उदयनराजेंनी मात्र या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम देत आपण राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या भूमिकेबरोबरच उदयनराजे भोसले असतील, असं सध्याचं चित्र आहे.