सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकचा धुव्वा
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2016 01:06 PM (IST)
नवी दिल्ली : सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत सरदार सिंगच्या भारतीय हॉकी संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानवरच्या या विजयामुळे भारतानं गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर अगदी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. मनप्रीत सिंगनं सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं. पण मोहम्मद इरफाननं सातव्या मिनिटाला गोल डागून पाकिस्तानला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतर भारतानं पाकिस्तानला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. एस. व्ही. सुनीलनं दहाव्या आणि 41व्या मिनिटाला गोल झळकावून भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. मग तलविंदरन सिंगनं 50व्या आणि रुपिंदरपाल सिंगनं 54व्या मिनिटाला गोल करुन भारताचा 5-1 असा विजय निश्चित केला.