अँटिग्वा : ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-20 महिला विश्वचषकाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरल आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने चौथ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आहे .

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करायला उतरलेला इंग्लंडचा संघ 19.4 षटकात अवघ्या 105 धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने 15.1 षटकात दोन गडी गमावून हे लक्ष्य सहज पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलिया संघाची सलामी जोडी अॅलिसा हीली आणि बेथ मून यांनी 29 धावाची भागीदारी केली. त्यानंतर हीली 22 धावा करुन सोफी अॅलेक्स्टोनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाली. त्यापाठोपाठ बेथ मूनी 14 धावावर बाद झाली. त्यानंतर गार्डनर आणि कर्णधार मिग लॅनिंगने 62 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवून दिला. गार्डनर 33 आणि लॅनिंग 28 धावांवर नाबाद राहिले.

प्रथम फलंदाजीला उतलेला इंग्लडच्या संघाने फारसी चांगली कामगिरी केली नाही. इंग्लडचा पूर्ण संघ अवघ्या 105 धावांवर बाद झाला इंग्लडकडून वाली वाटने सर्वाधिक धावांची खेळी केली. तिने 37 चेंडूत 43 धावा काढल्या.

ऑस्ट्रेलियाकडून पाचव्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारी फिरकी गोलंदाज अॅशलेग गार्डनर हिने 22 धावा देत तीन गडी बाद केले. या कामगिरीमुळे तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. तसेच अॅलिसा हिलीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने ट्वीटद्वारे महिला संघाच्या शानदार कामगिरीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.