मेलर्बन : सर्बियाच्या नोवाक ज्योकोविचनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. ज्योकोविचने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या राफेल नदालचा तीन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. ज्योकोविचनं हा सामना 6-3, 6-2, 6-3 असा सहज जिंकला.

या तिन्ही सेटमध्ये नदालला वरचढ होण्याची एकही संधी ज्योकोविचने दिली नाही. या विजयासह ज्योकोविचनं सर्वाधिक सात वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा मान मिळवला.  त्याआधी स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेड़ररनं सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.

ज्योकोविचचं ग्रँड स्लॅम कारकीर्दीतलं हे पंधरावं विजेतेपद ठरलं. ज्योकोविचच्या खजिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनच्या सात विजेतीपदांसह विम्बल्डनची चार, अमेरिकन ओपनची तीन तर फ्रेंच ओपनच्या एका विजेतीपदाचा समावेश आहे. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्यांच्या यादीत ज्योकोविच फेडरर (20) आणि नदाल (17) पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.