मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा क्रीडाविश्वाचा डोनाल्ड ट्रम्प असल्याची बोचरी टीका ऑस्ट्रेलियन मीडियानं केली आहे. विराट ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयी चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचा आरोपही डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रातील एका लेखात करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयीच्या बातम्यांबाबत विराटकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याचाही आरोप या लेखात करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात त्याच्यावर बीसीसीआय किंवा आयसीसी कोणतीही कारवाई करत नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. कायदा आपल्या जणू हातात असल्यासारखा विराट वागतो आणि तो कुणाचाही मुलाहिजा बाळगत नसल्याचा आरोप या लेखात करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी टीम इंडियाचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांचा अवमान केल्याचा डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी स्पष्ट इन्कार केला असून, त्यांची हीच प्रतिक्रिया विराटविरोधातील लेखात वापरण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नरच्या विकेटचा आनंद साजरा करताना विराटनं डाव्या हातानं आपला उजवा खांदा दाबून धरला होता. विराटनं पहिल्या डावातली आपली ही कृती जाणूनबुजून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना प्रत्युत्तर देण्यासाठी केल्याचं डेली टेलिग्राफनं म्हटलं आहे. कारण याच कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं विराटची विकेटही त्याच पद्धतीनं साजरी केली होती.