सिडनी : ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज मिचेल जॉनसनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मागील महिन्यात जॉनसनने बिग बॅश लीगमधून निवृत्तीची घोषणा केली होती. कंबरदुखीमुळे जॉनसनने निवृत्ती घेतली असल्याचं बोललं जात आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या जॉनसनला कंबरदुखीचा त्रास जाणवत होता. या त्रासामुळे जॉनसनला आयपीएल- 2018च्या अनेक सामन्यात खेळाताही आलं नव्हतं.

2015 साली जॉनसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.

निवृत्तीची घोषणा करताना जॉनसननं म्हटलं की, "बस आता, संपलं. मी माझ्या कारकिर्दितील शेवटचा चेंडू फेकला आहे. शेवटची विकेटही घेतली आहे. आज मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत आहे." पुढे जॉनसनने म्हटलं की, "मला पुढील वर्षापर्यंत अनेक टी-20 सामन्यात खेळायंच होतं. मात्र माझं शरीर आता साथ देत नाही. आयपीएलदरम्यान उद्भवलेली कंबरदुखीची समस्या संकेत होते की, मला आता काही विचार करावा लागेल."

"मी 100 टक्के खेळू शकत नसेल, तर मी संघासाठी 100 टक्के देऊ शकत नाही. माझ्यासाठी माझा संघ नेहमीच प्राथमिकता आहे. गेल्या दोन दमदार सीजनसाठी स्कॉर्चस यांचे आभार मानले पाहिजे. तसेच वाकानेही (वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन) गेली 10 वर्ष माझ्यासाठी खुप काही केलं, त्यासाठी त्यांचेही आभार", जॉनसनने मानले आहेत.

जॉनसनने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. चाहत्यांना उद्देशून जॉनसन म्हणाला की, "मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो, ज्यांनी मला समर्थन केलं. मी वाकाच्या मैदानातील वातावरण कधीही विसरणार नाही. मुलांची ते हसरे चेहरे माझ्या सदैव स्मरणात राहतील."

जॉनसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जॉनसनने 2005मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केलं. जॉनसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 590 विकेट घेतल्या आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 73 सामन्यात 28च्या सरासरीने 313 विकेट घेतल्या, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 153 सामन्यात 25च्या सरासरीने 239 विकेट घेतल्या, तर टी-20च्या 30 सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत. आयपीएममध्येही 54 सामन्यात 28च्या सरासरीन जॉनसनने 61 विकेट घेतल्या आहेत.

अॅशेस मालिकेतील दमदार प्रदर्शनात जॉनसनने नेहमी चांगली कामगिरी केली. तसेच 2015च्या वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाला जिंकून देण्यात जॉनसनने महत्त्वाची भूमिका निभावली होती. वर्ल्डकप -2015मध्ये जॉनसनने 15 विकेट पटकावल्या होत्या.