सिडनी : ऑस्ट्रेलियाचे सीनियर खेळाडू आगामी बांगलादेश दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. ही माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मागील काही दिवसांपासून क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत (सीए) वेतन वाढीबाबत वाद सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स संघाचे (एसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी एलेस्टेअर निकोलसन यांच्यासोबत एका अज्ञात स्थळी बैठक पार पडली. ज्यामध्ये सीएसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानं कोणते पर्याय समोर आहेत याचा विचार करण्यात आला.

एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानुसार, खेळाडूंनी अनेक पर्यायांवर विचार केला. ज्यामध्ये बांगलादेश दौऱ्यात सहभागी न होण्याच्याही पर्यायावर विचार करण्यात आला आहे.

'चांगलं मानधन मिळणं हा आमचा हक्क आहे. तो हक्क कोणीही हिरावू शकत नाही.' असं मत डेव्हिड वॉर्नरनं व्यक्त केलं होतं. मात्र, अद्यापही ऑस्ट्रेलिया बोर्डानं खेळाडूंची मागणी मान्य केलेली नाही.