सिडनी : बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर एका वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगत असलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फेडरेशनने स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट यांच्या शिक्षेत कपात करण्याची मागणी केली आहे.


स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची, तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. न्याय देताना काही उणिवाही राहून जातात, असं ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फेडरेशनचे प्रमुख ग्रेग डायेर यांनी म्हटलं आहे.

''ही प्रचंड मोठी आणि कठोर शिक्षा आहे. या खेळाडूंच्या दुःखी चेहऱ्यांनी संपूर्ण जगाला संदेश दिला आहे. हे दुःख एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही. मला असं वाटतं की संपूर्ण ऑस्ट्रेलिया देश स्मिथसोबत रडला आहे, मी सुद्धा रडलो,'' असं ग्रेग डायेर म्हणाले.

''या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये लवकरात लवकर पुनरागमन करायला हवं. कारण, 2019 चा विश्वचषक आणि अॅशेस 2019 जास्त दूर नाही,'' असंही ग्रेग डायेर म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू दोषी आढळून आले होते. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट यांचा यामध्ये समावेश आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येकी बारा महिन्यांची तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंद घालण्यात आली आहे.