ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लिमन यांचा राजीनामा
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2018 09:43 PM (IST)
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या चौथ्या कसोटी सामन्याची जबाबदारी पार पाडूनच ते प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार आहेत.
कॅनबेरा : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्लीनचिट मिळूनही डॅरेन लिमन यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना पत्रकार परिषदेत भावूक झाल्याचं पाहिल्यानंतर लिमन यांनी हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या चौथ्या कसोटी सामन्याची जबाबदारी पार पाडूनच ते प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची हीच वेळ असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली. आपल्या आयुष्यातला हा सर्वात कठोर निर्णय असल्याचंही लिमन यांनी सांगितलं. आपण राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी बुधवारी जाहीर केलं होतं, मात्र स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट यांना रडताना पाहून त्यांनी आपला निर्णय बदलला. लिमन 2019 मधील अॅशेस मालिकेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. अप्रत्यक्षपणे आपणच या प्रकाराला जबाबदार असल्याची भावना लिमन यांनी व्यक्त केली. संघाचं प्रशिक्षकपद भूषवण्याचा अनुभव जबरदस्त होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ यातून सावरेल, अशी आशा आहे. दोषी क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियन चाहते माफ करतील आणि पुन्हा आपल्या हृदयात स्थान देतील, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथ आपली चूक मान्य करताना पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला. स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे बारा महिन्यांची बंद घातली आहे. शिवाय त्याची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि तो पुन्हा कधीही कर्णधार होऊ शकणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं. संबंधित बातम्या :