मेलबर्न : डेव्हिड वॉर्नरच्या आणखी एका नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत सात विकेट्सनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मेलबर्नच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियासमोर 143 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं हे आव्हान चौदा चेंडू आणि सात विकेट्स राखून सहज पार केलं. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरनं 44 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. त्यात चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. वॉर्नरसह कर्णधार फिंचनं 37 धावा फटकावल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर अॅश्टन टर्नरच्या साथीला घेत वॉर्नरनं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. त्याआधी मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन आणि पॅट कमिन्सच्या भेदक आक्रमणासमोर श्रीलंकेला मर्यादित 20 षटकांत सहा बाद 142 धावांचीच मजल मारता आली. स्टार्क, रिचर्डसन आणि कमिन्सनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. श्रीलंकेकडून कुशल परेरानं सर्वाधिक 57 धावांचं योगदान दिलं. उभय संघातल्या पहिल्या दोन्ही सामन्यांतही कांगारुंनी एकहाती वर्चस्व गाजवलं होतं. अॅडलेडच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियानं 134 धावांनी बाजी मारली होती. तर ब्रिस्बेनची दुसरी टी ट्वेन्टी कांगारुंनी नऊ विकेट्सनी जिंकली होती.