मुंबई : इंग्लंडविरुद्ध  झालेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला 5-0 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर गेला आहे.  मागील 30 वर्षात पहिल्यांदाच कांगारुवर सहाव्या स्थानी जाण्याची नामुष्की ओढावली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सुफडा साफ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे चार गुण कमी झाले. त्यामुळे वनडे रँकिंगमध्ये कांगारु आता पाकिस्तानच्याही खाली  गेले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचे आता 101 गुण आहेत. तीन विश्वचषक जिंकत एकेकाळी जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे,ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश  दिल्यामुळे इंग्लंडने आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये 125 गुणांसह इंग्लंड पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाकडे 122 गुण आहेत. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी करून पहिले स्थान मिळवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. आयसीसी वनडे रँकिंग : संघ                            पॉईंट्स इंग्लंड                        125 भारत                         122 द. आफ्रिका                113 न्यूझीलंड                     112 पाकिस्तान                  102 ऑस्ट्रेलिया                   101 बांग्लादेश                     93 श्रीलंका                         77 वेस्ट इंडिज                   69