मुंबई : आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर अनेक फलंदाजांची भंबेरी उडवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जीममध्ये वर्कआऊट करताना जॉन्सनला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याला तब्बल 16 टाकेही घालावे लागले आहेत.


जॉन्सननं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, आपण स्वस्थ असल्याचंही त्याने यावेळी म्हटलं आहे.


36 वर्षीय जॉन्सन आयपीएलच्या 11व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. केकेआरने त्याला 2 कोटीमध्ये खरेदी केलं आहे. त्यामुळे जॉन्सन लवकर बरा होऊन मैदानात परतेल अशी आशा केकेआरकडून करण्यात येत आहे. 7 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. मागील मोसमात जॉन्सन मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.

ऑस्ट्रेलियाचा हा डावखुऱ्या गोलंदाज 73 कसोटी, 153 वनडे आमि 30 टी-20 सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जॉन्सननं 3.33 च्या सरासरीने 313 बळी घेतले आहेत. तब्बल 12 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे.

तर वनडे क्रिकेटमध्येही 4.83च्या सरासरीने जॉन्सनने 239 गडी बाद केले आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्येही जॉन्सनच्या नावावर 38 विकेट जमा आहेत.