Asian Kabaddi Championship:  दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद (Asian Kabaddi Championship ) स्पर्धेत भारतीय संघाने अजिंक्यपद (Indian Team Won Asian Kabaddi Championship) पटकावले. अंतिम फेरीत भारतीय संघाने इराणवर 42-32 अशी मात (India Beat Iran) केली. भारतीय संघाचे हे आठवे आशियाई अजिंक्यपद आहे. 


अंतिम फेरीत भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सुरुवातीला इराणने आघाडी घेतली होती. त्यानंतर टीम इंडियाने जोरदार मुसंडी मारत सामन्यात पुनरागमन केले. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला कर्णधार पवन सहरावत आणि अस्लम इनामदार यांनी यशस्वी चढाई करत इराणच्या संघाला ऑल आऊट केले. कर्णधार पवन सहरावतने सामन्यात एक सुपर 10 देखील मिळवले. 


सामन्यात लयीत असलेल्या भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत इराणी संघावर वर्चस्व गाजवले. सामन्यात भारताने इराणच्या संघाला काही बोनस गुण दिले. मात्र, भारतीय संघाने 19 व्या मिनिटाला इराणच्या संघाला दुसऱ्यांदा ऑल आऊट करत सामन्यावरील आपली पकड आणखी मजबूत केली. सामन्याच्या फर्स्ट हाफमध्ये भारताने इराणवर 23-11 अशी आघाडी मिळवली होती. 


इराणचा कर्णधार मोहम्मदरेजा शादलू चियानेह याने आक्रमक चढाई केली. दोन अंकी गुण मिळवणाऱ्या चढाईसह त्याने एक सुपर रेड केली. याच्या बळावर सामन्याच्या 29 व्या मिनिटात इराणच्या संघाला भारतीय संघाला पहिल्यांदा ऑल आऊट करण्यास यश मिळाले. 






सामन्याच्या अंतिम टप्प्यात इराणच्या खेळाडूंनी चांगले प्रयत्न केले. अखेरच्या दोन मिनिटांत इराणने गुणांमधील फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने हा सामना 42-32 अशा गुणांसह जिंकला. 


आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, इराण, जपान, कोरिया, चीन तैपई आणि हाँगकाँग हे देश सहभागी झाले होते. भारताने सर्व साखळी सामने जिंकले आणि गुणतालिके अव्वल स्थान गाठले. तर, इराणला एका साखळी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव भारतानेच केला होता. 


स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये भारताने पहिल्या दिवशी कोरियाविरुद्ध (76-13) सर्वात मोठा विजय नोंदवला. त्याचवेळी, स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी भारतीय संघाने इराणविरुद्ध (33-28) अशा सर्वात कमी गुण फरकाने विजय मिळवला.