Asian Kabaddi Championship 2023 : आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य इराणचा 33-28 अशा फरकाने पराभव केला. भारत आणि इराण यांच्यात पहिल्या मिनिटांपासूनच रंगतदार सामना झाला. अखेरीस भारताने बाजी मारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा हा लागोपाठ चौथा विजय आहे. 


भारतीय संघाने गुरुवारी डोंग-ईई इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी सेओकडांग सांस्कृतिक केंद्र (Dong-Eui Institute of Technology Seokdang Cultural Center in Busan, Republic of Korea) येथे झालेल्या स्पर्धेत इराणचा पराभव केला. इराणचा पराभव करत भारतीय संघ गुणतालिकेत आघाडीवर पोहचलाय. भारतीय संघाने लागोपाठ चौथ्या विजयाची नोंद केली आहे.


फायनल सामन्यापूर्वी भारतीय संघ अखेरचा साखळी सामना शुक्रवारी हाँगकाँग विरोधात खेळणार आहे. अखेरच्या साखळी सामन्यानंतर गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या दोन संघामध्ये फायनलचा थरार होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार पवन सहरावत याने दमदार खेळीचं प्रदर्शन केले. पवन याने 33 पैकी 16 गुण एकट्याने मिळवले. असलम इनामदारने 11 व्या मिनिटाला मारलेली रेडमध्ये दोन गुणांची कमाई केली. भारताने इराणला ऑलआऊट करत आपली आघाडी 11-5 केली. 


सहरावत याने पहिल्या हापला चार मिनिटं बाकी असताना भारताची आघाडी 17-7 केली.  इराणचा डिफेंडर इनामदार याच्याविरोधात सुपर टॅकलचा वापर केला. भारताने पहिल्या हाप अखेरीस आघाडी 19-9 इतकी केली. सध्याच्या आशियाई चॅम्पियन इराण याने पहिल्या हाफनंतर आपला खेळ उंचावत शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या हापच्या सुरुवातीलाच इराण याने भारताला ऑलआऊट केले... इराण याने 26-22 पर्यंत गुण पोहचले होते. इराण फक्त चार गुणांनी भारताच्या मागे होता.  अखेरच्या काही मिनिटांत भारताने आपला खेळ उंचावला. सुपर टॅकलनंतर अर्जुन देशवाल याने दोन गुण मिळवत... भारताला 33-28 च्या फरकाने विजय मिळवून दिला. 






भारतीय संघाने लागोपाठ चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने आठव्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशीपच्या विजायाकडे कूच केली आहे. आतापर्यंत  भारताने सात आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरलेय. इराण संघाने एक वेळा चषकावर नाव कोरलेय. इराण संघाने 2003 मध्ये आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरलेय.