Asian Games 2023:  चीनमधील हांगझोऊ शहरात सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली आहेत. भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कार्तिक कुमारने 28:15:38 या वेळेसह रौप्यपदक जिंकले. तर गुलवीरने 28:17:21 या वेळेसह कांस्यपदक पटकावले. 


या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समधील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी सहाव्या दिवशी किरण बालियानने महिलांच्या शॉट पुट प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.


'एशियन गेम्स 2023' मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 10 सुवर्णपदके पटकावली आहेत. याशिवाय 14 रौप्य आणि 14 कांस्यपदकेही जिंकली असून, त्यानंतर एकूण पदकांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. भारताला ऍथलेटिक्समध्ये आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये भालाफेक स्पर्धेत सर्वांच्या नजरा नीरज चोप्रावर असतील.


'एशियन गेम्स 2023' च्या सातव्या दिवशी महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेतही भारताची कामगिरी दिसून आली. भारताच्या सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिनी जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यासह या स्पर्धेतील भारताचे पदकही निश्चित झाले आहे.






स्क्वॉशमध्ये पुरुष संघाने सुवर्णपदक पटकावले...


सौरव घोषालच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष स्क्वॉश संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध 2-1 अशा रोमहर्षक पद्धतीने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. याआधी सकाळी भारताने मिश्र दुहेरी टेनिसचा सुवर्णपदक सामनाही जिंकला होता.


 






बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरीत धडक...


बॅडमिंटनच्या पुरुष गटात भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताने कोरियाचा 3-2 असा पराभव केला. आता अंतिम  फेरीत भारताचा सामना चीनसोबत होणार आहे. भारताने पहिल्यांदाच बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरी गाठली आहे.