Asian Games 2023 Day 2: 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस... पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात पाच पदकं आली, पण त्यात एकही सुवर्णपदक नव्हतं. पण आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आशियाई गेम्समधील भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णकामगिरीनं झाली. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार या त्रिकुटानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. तर रोइंगमध्येही भारतानं कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे आशियाई गेम्समधील एकुण पदकांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.
रोईंगमध्ये भारताला कांस्यपदक
भारताला आजच्या दुसऱ्या दिवशी आणखी एक पदक मिळालं आहे. जसविंदर सिंह, आशिष, पुनीत कुमार आणि भीम सिंह यांनी रोईंगच्या पुरुषांच्या कॉक्सलेस फोर स्पर्धेत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताच्या बलराज पनवारचं रोईंगमधील पदक हुकलं. बलराजनं पुरुष एकेरी स्कल्सच्या अंतिम फेरीत चौथं स्थान पटकावलं. या स्पर्धेत चीननं सुवर्ण, जपाननं रौप्य आणि हाँगकाँगनं कांस्यपदक जिंकले.
भारताच्या खात्यात आतापर्यंत सात पदकं
- मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता जिंदल : 10 मीटर एयर रायफल टीम इव्हेंट (नेमबाजी): रौप्यपदक
- अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह, मेन्स लाईटवेट डबल स्कल्स (रोईंग): रौप्यपदक
- बाबू लाल आणि लेख राम, मेन्स कॉक्सलेस डबल्स : (रोईंग) : कांस्यपदक
- मेन्स कॉक्स्ड 8 टीम : (रोईंग) : सिल्वर
- रमिता जिंदल-वूमन्स 10 मीटर एयर रायफल (शुटिंग) : कांस्यपदक
- ऐश्वर्य तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पंवार, 10 मीटर एयर रायफल टीम इव्हेंट (नेमबाजी) : सुवर्णपदक
- आशीष, भीम सिंह, जसविंदर सिंह आणि पुनित कुमार-मेन्स कॉक्सलेस 4 (रोईंग) : कांस्यपदक
पहिल्या दिवशी पाच पदकांची कमाई
भारतानं स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच दमदार सुरुवात केली आणि रविवारी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 5 पदकं जिंकली. स्टार नेमबाज मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता या त्रिकुटानं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. नेमबाजीत आणखी एक पदक जिंकलं तर रोइंगमध्ये देशाला आतापर्यंत 3 पदकं मिळाली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :