जकार्ता : भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालनं जकार्ता एशियाडमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यासोबतच एशियाडमध्ये भारताचं महिला एकेरीचं पदक निश्चित झालं आहे.



ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या सायनानं उपांत्य फेरीत थायलंडच्या रॅचनॉक इंतेनॉनवर दोन सरळ सेट्समध्ये मात केली. सायनानं हा सामना 21-18 असा जिंकला. तर पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात थायलंडच्याच निपॉन जिंदापॉलचं आव्हान 21-11, 16-21, 21-14 असं मोडीत काढलं.


1982 नंतर पहिल्यांदाच एशियाडमध्ये भारताला बॅडमिंटन एकेरीचं पदक मिळणार आहे. याआधी भारताच्या सय्यद मोदींनी 1982 च्या नवी दिल्ली एशियाडमध्ये पुरुष एकेरीचं कांस्यपदक पटकावलं होतं.


भारताला एकूण 36 पदकं
भारत या स्पर्धेत 36 पदकांसह नवव्या स्थानावर आहे. यामध्ये सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे.