जकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारताच्या नेमबाजांनी आपली पदकांची मालिका सुरुच ठेवली आहे.  10 मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दीपक कुमारने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

उत्तम कामगिरी करत भारतीय नेमबाजांनी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारताला पदक मिळवून दिले.  दीपक  कुमारनं 247.1 गुणांची नोंद करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. दीपकने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत पदक मिळवले आहे.

पात्रता फेरीत भारताच्या रवी कुमार आणि दीपक  कुमार यांनी चांगला खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्या दिवशी कांस्यपदक मिळवलेल्या रवी कुमारनेही उत्तम खेळ करत आपलं आव्हान कायम राखलं होतं. पण अखेरच्या क्षणी अपेक्षित कामगिरी करता न आल्याने रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

दुसरीकडे दीपक कुमारच्या हातातून सामन्यावरील पकड निसटून जात होती. मात्र अत्यंत संयमी खेळ करत दीपकनं रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेत सुवर्ण पदक चीनच्या यांग हाओराने जिंकले, तर कांस्य पदक शाओचुआन पटकावले.

एशियाडमध्ये पहिल्या दिवशी भारताची कामगिरी


पैलवान बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात बजरंगने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम लढतीत जपानच्या ताकातानी दाईचीचं कडवं आव्हान 10-8 असं मोडीत काढलं.

भारताचे नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमारने 18 व्या एशियाडमध्ये भारताला पहिल्या पदकाची कमाई करुन दिली. या जोडीने 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावलं.

संबंधित बातम्या  
'बजरंगा'ची कमाल, एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्ण

आशियाई स्पर्धा : 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत भारताला 'कांस्य'

एशियाड : पात्रता फेरीतच पैलवान सुशील कुमारला पराभवाचा धक्का

45 देश, 36 खेळ, 572 खेळाडू आणि लक्ष्य एकच... एशियाडचं पदक