Sri Lanka Beats Pakistan, Asia Cup 2022: आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलंय. आशिया चषकाच्या इतिहासात चौथ्यांदा जेतेपदाच्या लढतीत श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. यापूर्वी या दोघांमध्ये तीनवेळा खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत श्रीलंकेनं दोनदा तर, पाकिस्ताननं एकदा विजय मिळवलाय. 


श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील चौथ्या चषकात कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्यात रुपात संघाला दोन मोठे धक्के बसले.मात्र, त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पण इफ्तिखार 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. मोहम्मद नवाजही स्वस्तात माघारी परतला. पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात हसरंगानं तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. अखेर पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून प्रमोद मादुशाननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, वानिंदु हसरंगाला तीन विकेट्स मिळाल्या. याशिवाय,  चमिका करुणारत्नेनं दोन आणि महेश तीक्ष्णानं एक विकेट्स घेतली.


भानुका राजपक्षेनं श्रीलंकेचा डाव सावरला
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आलं. श्रीलंकेच्या संघानं पॉवर प्लेच्या आत तीन विकेट्स गमावले. श्रीलंकेचा निम्मा संघ 10 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. कुसल मेंडिस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. निसांका आणि सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 17 धावांची 21 धावांची भागीदारी केली. पण निसांका 11 चेंडूत 8 धावा करून माघारी परतला.दानुष्का गुणथिलकलाही (4 चेंडू 1 धाव) या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. यानंतर धनंजय डी सिल्वाही ( 21 चेंडू 28 धावा) स्वस्तात माघारी परतला. कर्णधार दासुन शनाकाही अवघ्या दोन धावांवर असताना बाद झाला. 


श्रीलंकेच्या संघानं अखेरच्या 5 षटकात 53 धावा कुटल्या
हसरंगा आणि राजपक्षे यांनी पाचव्या विकेटसाठी 36 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली. हसरंगा 21 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. पण भानुका राजपक्षेनं संघाची एक बाजू संभाळून ठेवली. त्यानं चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूत 54 धावांची भागीदारी करत श्रीलंकेची धावसंख्या 170 धावांपर्यंत पोहचवली. भानुकानं नाबाद 71 धावांची खेळी केली. ज्यात  6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. चमिकानं 14 चेंडूत 14 धावा केल्या. श्रीलंकेच्या संघानं अखेरच्या 5 षटकात 53 धावा कुटल्या. पाकिस्तानकडून हरीस रौफनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाह, शादाब खान आणि इफ्तिखर अहमद यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


हे देखील वाचा-