SL vs AFG : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत सुपर 4 फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानवर (SL vs AFG) दमदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानला 4 गडी राखून पराभूत केलं असून सामन्यात श्रीलंकेच्या सलामीवीरांसह शेवटच्या फळीतील फलंदाजांनीही कमाल कामगिरी केली.


शारजाहमध्ये झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने शेवटच्या षटकात 6 गडी गमावून  लक्ष्याचा विजयी पाठलाग केला. रोमहर्षक सामन्यात भानुका राजपक्षेने श्रीलंकेसाठी दमदार आणि अत्यंत गेमचेंजिंग खेळी खेळली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने अवघ्या 14 चेंडूत 31 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार देखील आला.


सामन्याचा लेखा-जोखा


सामन्यात सर्वात आधी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून चांगली कामगिरी दाखवली. सलामीवीर यष्टीरक्षक गुरबाज याने 84 धावांची अफलातून खेळी केली. तर इब्राहीम झद्रानने देखील 40 धावा केल्यामुळे अफगाणिस्तानचा डाव 175 धावांपर्यंत पोहोचला. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजीची सुरुवात झाली. ज्यानंतर मेंडिस आणि निसांका यांनी अनुक्रमे 36 आणि 35 धावांची खेळी करत दमदार सुरुवात करु दिली. गुणथालिकाने 33 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यानंतर अखेरच्या षटकात भानुका राजपक्षेने 14 चेंडूत 31 धावा करत सामना श्रीलंकेला जिंकवून दिला.






आशिया चषक 2022 सुपर-4 मधील उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक



  • भारत विरुद्ध पाकिस्तान 4 सप्टेंबर 2022

  • भारत विरुद्ध श्रीलंका- 6 सप्टेंबर 2022

  • अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान 7 सप्टेंबर 2022

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान- 8 सप्टेंबर 2022

  • श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान 9 सप्टेंबर 2022 


हे देखील वाचा-