Sanju Samson Rishabh Pant Asia Cup 2022 Team India : पाकिस्तान आणि श्रीलंकाविरोधात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचं आशिया चषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. काही दिवसांत टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी भारतीय संघातील अनेक कमकुवत बाजू समोर आल्या आहेत. यावरुन चाहत्यांसाठी माजी खेळाडूंनी टीम इंडियावर सडकून टीका केली. आशिया चषकामध्ये भारताने ऋषभ पंतला विकेटकिपर म्हणून स्थान दिलं होतं. त्यासोबत अनुभवी दिनेश कार्तिकलाही 15 मध्ये स्थान देण्यात आले. पण कार्तिकला जास्त संधी मिळाली नाही. पंतला तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. विकेटकिपर फलंदाज म्हणून संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकत होती. पण संजू सॅमसनला संधी मिळाली नाही.  


विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत प्रतिभावंत खेळाडू आहे. पण त्याच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. टी 20 क्रिकेटमध्ये पंतला अद्याप छाप सोडता आलेली नाही. तसेच असतानाही ऋषभ पंतला टीम इंडियानं संधी दिली आहे. कार्तिकला पाकिस्तानविरोधात पहिल्या सामन्यात स्थान देण्यात आलं. पण त्यानंतर झालेल्या तिन्ही सामन्यात पंतला संधी देण्यात आली. या सामन्यात पंतला मोठी खेळी करण्यात अपयश आले. चुकीचा फटका मारत पंत बाद झाल्याचं पाहायला मिळालं. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पंतने 14 तर दुसऱ्या सामन्यात 17 धावांची खेळी केली. 


ऋषभ पंत आणि संजू सॅमसनच्या टी 20 क्रिकेटमधील कामगिरीवर तुलना केली, तर यामध्ये संजू सॅमसनचं पारडं जड दिसतेय.  संजू सॅमसनचा स्ट्राइक रेटही ऋषभ पंतपेक्षा चांगला आहे. जेव्हा जेव्हा संजू सॅमसनला संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यानं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतरही मॅनेजमेंटनं संजू सॅमसनवर विश्वास दाखवला नाही. संजू सॅमसनचा स्ट्राइक रेट 158.4 इतका आहे. तर पंतता स्ट्राइक रेट 134.1 इतका आहे. तर कार्तिकचा यंदाचा स्ट्राइक रेट 133.3 इतका आहे. असे असतानाही अद्याप संजूवर विश्वास दाखवण्यात आला नाही.  
विश्वचषकाआधी भारतीय संघ उणिवा दूर करणार का?
युएईतल्या आशिया चषकात ठळकपणे दिसून आलेल्या भारतीय संघातल्या उणिवा जादूची कांडी फिरवल्यासारख्या तातडीनं दूर करता येणार नाहीत. पण ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आव्हान लक्षात घेता या उणिवांवर उपाययोजना करण्यासाठी बीसीसीआयच्या हाताशी केवळ एकच महिना आहे. ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाला गेल्या काही वर्षांत वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकांवर आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळंच विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आता आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे विश्वचषकांत भारताच्या कामगिरीत सुधारणा करायची असेल, तर बीसीसीआय आणि सीनियर निवड समितीलाही आपल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे.