Mohamad Hafiz on Arshdeep Singh : टीम इंडियाला रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक चूका केल्याचं पाहायला मिळालं. या मॅचमध्ये भारतीय फलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा धरला आहे. अर्शदीप सिंहने या मॅचमध्ये आसिफ अलीची कॅच सोडली. ही चूक भारतीय संघाला पुढे चांगलीच महागात पडली. कारण आसिफने आठ चेंडूंमध्ये 16 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. यानंतर आता अर्शदीपला ट्रोल केलं जातं आहे. दरम्यान पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हाफीज अर्शदीपच्या समर्थनार्थ उतरला आहे. त्यानं अर्शदिपला ट्रोल न करण्याचं आवाहन केलं आहे. 


काय म्हणाला मोहम्मद हाफीज?


पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हाफीज यानं ट्विट करत म्हटलं आहे की, 'खेळामध्ये चुका प्रत्येकाकडून होतात. माझं भारतीय संघाच्या चाहत्यांना आवाहन आहे की, अशा खेळातूल चुकांमुळे कुणाचाही अपमान करु नका.' दरम्यान अर्शदीपच्या समर्थनार्थ भारताचा माजी किक्रेटपटू हरभजन सिंह यानंही ट्विट केलं आहे. हरभजनने ट्विट केलंय की, 'अर्शदीप सिंहवर टीका करणं थांबवा. कोणीही मुद्दाम कॅच सोडत नाही. आम्हाला भारताच्या खेळाडूंचा अभिमान आहे. पाकिस्तानविरोधात भारत चांगलं खेळलो. अर्शदीप आणि संघाबद्दलच्या वाईट गोष्टी बोलणं लज्जास्पद आहे. अर्शदीप सोनं आहे.' 






काय म्हणाला विराट कोहली?


भारताचा स्टार क्रिकेटवर विराट कोहलीनं अर्शदीप सिंहला पाठिंबा दिला आहे. विराटने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, 'चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा मी पाकिस्तानविरुद्ध माझा पहिला सामना खेळत होतो, तेव्हा मीही खराब शॉट खेळून आऊट झालो होतो. दबावाखाली कोणीही चूक करू शकतो. संघातील वातावरण सध्या चांगलंच आहे. अर्शदीपला त्याची चूक समजून घ्यावी लागेल जेणेकरुन तो पुढच्या वेळी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकेल.'






सोशल मीडियावर मीम्स व्हायरल


दरम्यान, महत्त्वाची कॅच सोडल्यानं अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. भारताच्या पराभवानंतर नेटकरी अर्शदीप सिंहवर संतापलेले पाहायला मिळत आहेत. नेटकरी सोशल मीडियावर अर्शदीपला ट्रोल करत आहे. या संदर्भातील अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ट्विटवर #ArshdeepSingh ट्रेंडींगमध्ये आहे. तर याच्या उलट काही चाहते अर्शदीपच्या समर्थनार्थ उतरले आहेत. त्यांनी अर्शदीपला पाठिंबा दिला आहे.